Ad will apear here
Next
पुस्तकांतली खूण कराया


इंदिरा संत आणि पद्मा गोळे या कवयित्रींच्या कविता म्हणजे साहित्यप्रेमींसाठी एक वेगळीच पर्वणी असते. ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या विशेष उपक्रमात या दोन्ही कवयित्रींची एकेक कविता आपल्यासमोर सादर केली आहे रत्नागिरीतील मुक्त पत्रकार, लेखिका ज्योती अवसरे-मुळ्ये यांनी...
...........
पुस्तकांतली खूण कराया

इंदिरा संतपुस्तकांतली खूण कराया
दिले एकदा पीस पांढरे;

पिसाहुनि सुकुमार कांहिसे
देतां घेतां त्यांत थरारे.

मेजावरचे वजन छानसे
म्हणुन दिला नाजूक शिंपला;
देतां घेतां उमटे कांही
मिना तयाचा त्यावर जडला.
 
असेच कांही द्यावे घ्यावे
दिला एकदा ताजा मरवा;
देतां घेतां त्यातं मिसळला
गंध मनांतिल त्याहुन हिरवा.
- इंदिरा संत
(इंदिरा संत यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी https://goo.gl/Z76F3v येथे क्लिक करा. इंदिरा संत यांच्या निवडक कविता अन् त्यांवरचे लेख वाचण्यासाठी https://goo.gl/QsYZPi येथे क्लिक करा.)
.............
मी घरात आले

पद्मा गोळेउंबऱ्यावरचे माप सांडून
मी आत, घरात आले,
दोन डोळ्यांतली ज्योत झाले,
माझे डोळे खाली वळले.
भुई म्हणाली, ‘तू माझी!
काढ केर, स्वच्छ कर.’
मी म्हटलं, ‘खरंच गं आई’
केरसुणी झाले, रांगोळी झाले.

चूल म्हणाली, ‘तू माझी.’
मी तिची लाकडं झाले.
जातं म्हणालं, ‘तू माझी.’
गहू झाले, ज्वारी झाले.
उखळीतलं भात झाले;
ताकातली रवी होऊन
मथणीत नाचत राहिले.

भिंत होऊन, छप्पर होऊन,
गुपितं राखली, छिद्रं झाकली;
पणती, वात, तेल होऊन
कोनेकोपरे उजळून टाकले.
सून झाले, बायको झाले,
आई झाले, सासू झाले,
माझी मला हरवून बसले.

आता सोंगे पुरे झाली;
सारी ओझी जड झाली.
उतरून ठेवून आता तरी
माझी मला शोधू दे;
तुकडे तुकडे जमवू दे.
विशाल काही पुजू दे.
मोकळा श्वास घेऊ दे.
श्वास दिला, त्याचा ध्यास
घेत घेत जाऊ दे!
- पद्मा गोळे

(मराठी राजभाषा दिनानिमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध झालेले सर्व लेख, कविता आणि व्हिडिओ https://goo.gl/qgDdWU या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZYWBM
Similar Posts
‘जिज्ञासा’तर्फे साहित्य अभिवाचन स्पर्धा उत्साहात रत्नागिरी : गेली ३२ वर्षे सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने नवनवीन उपक्रम राबविणाऱ्या येथील जिज्ञासा थिएटर्सतर्फे नुकतेच अ. भा. साहित्य अभिवाचन स्पर्धेचे आयोजन देसाई हायस्कूल येथे आयोजित करण्यात आले.
‘जिज्ञासा’तर्फे ‘धम्माल शिबिर २०१८’चे आयोजन रत्नागिरी : जिज्ञासा थिएटर्सतर्फे गेली ३४ वर्षे विविध कलागुणांचे वैविध्यपूर्ण सांस्कृतिक उपक्रम राबविले जात आहेत. या वर्षीही मे महिन्याच्या सुट्टीत वय सहा ते अगदी १०६ वर्षांपर्यंत सर्वांसाठी एक आगळे वेगळे धम्माल शिबिर संस्थेतर्फे आयोजित केले आहे.
आम्ही कोण? आधुनिक कवितेचे जनक म्हणजे कवी केशवसुत . १५ मार्च हा त्यांचा जन्मदिन. त्यांनी फुंकलेल्या ‘तुतारी’ने पुढे अनेक कवी आणि साहित्यिकांना प्रेरणा मिळाली. ‘आम्ही कोण’ ही केशवसुतांची कविता आपल्यापुढे सादर केली आहे रत्नागिरीतील पत्रकार आणि गायक अभिजित नांदगावकर यांनी. हे सादरीकरण कवी केशवसुतांच्या मालगुंड (जि
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे पुरस्कार जाहीर; २२ डिसेंबरला वितरण सोहळा रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघाने या वर्षीचे विविध पुरस्कार दोन नोव्हेंबर २०१९ रोजी घोषित केले. दर्पण पुरस्कार पत्रकार ज्योती मुळ्ये यांना (रत्नागिरी), आचार्य नारळकर पुरस्कार सूर्यकांत घाटे (ओणी) यांना, उद्योजक पुरस्कार निशिकांत तथा नंदू तांबे (शिरवली) यांना, आदर्श कीर्तनकार पुरस्कार ह

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language